Tuesday, 8 February 2022

प्रिय लता ताई…..



गडचिरोली जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात वाढत असतांना मला माझ्या बाबांनी तुझी गाणी ऐकवली. माझे बाबा भजन छान गात असत. तुझे पंडित भीमसेनजी सोबत गायलेले "बाजे रे मुरलिया.." हे गीत त्यांनीच ऐकवले. लहानपणी ते तेवढे आवडले नाही. मोठा झाल्यानंतर मात्र तुमच्या दोघांच्या स्वरातले ते गीत कीतीदा ऐकले त्याची गणती मला करवता येणार नाही.



मला वाटतं मी तीसरीत होतो. आमच्या गावात सालेवार कपडे विकायला आणत असत. लहानपणी आमच्याकडेच काय तर सम्पूर्ण गावात कोणाकडेही रेडिओ नवतं. टेपरेकॉर्डर तर दूरची गोष्ट. एकदा एक सालेवार काका रेडिओ वाजवत त्यांच्या कपड्यांच्या दुकानात बसले होते. त्यांच्या रेडिओवर "जब से मिलें नैना तुमसे मिलें नैना.." हे गाणे चाललेले. मला बोल कळत नव्हते कारण मला त्या वयात हिंदी समजत नव्हती. पण मला तुझा आवाज आणि त्या गाण्याची धुन भुरळ पाडून गेली. मला जमेल तसे ते गाणे कित्येक दिवस मी गुणगुणत राहिलो.

जसजसा मोठा होत गेलो, तुझी अनेक गाणी ऐकली आणि ऐकतच राहिलो. दहावित असतांना गडचिरोलीच्या होस्टेलला पड़लेलेल्या सुट्टीच्या दिवसांत संघ कार्यालयात राहायचो. तेथे एक टेपरेकॉर्डर होते. मुख्यता संघ गीतांचे कैसेट्स कार्यालयात होते. मला कोणाकडून तरी "सर पे हिमालय का छत्र है, चरणों मे नदिया एकत्र है..", "आकाश के उस पार भी आकाश है..." ही गाणी मुद्रीत असलेले कैसेट मिळाले. कार्यालयात कोणी नसतांना ती सगळी गाणी कीतीदा तरी ऐकली. अकरव्या वर्गात शिकत असतांना एकदा शिक्षकांनी गाणी कोण छान म्हणतो म्हणून विचारले. मी तसा जरा लाजरा-बुजराच पण तू गायिलेले "सर पे हिमालय का छत्र है.." हे गाणे गाण्याची उर्मी काही केल्या शमेना. मग काय उठलो, शिक्षकांना म्हणालो मला गाणे गायचेय. गाणे छान जमले आणि वर्गात सगळ्यांची वाह-वायकी कमावली. अश्या किती तरी आठवणी तुझ्या गाण्यांशी जुळलेल्या आहेत.

स्मार्ट फ़ोन हाती आल्यानंतर तुझी मराठी आणि हिंदी मधली अनेक भजनं ऐकलीत. संत ज्ञानेशाच्या "अवचित परिमळू, झुळकला आळूमाळू", "पैल तो गे काऊ कोकताहे.." ह्या रचना तुझ्या आवाजात अगदी जिवंत होतात आणि तल्लीन करुन सोडतात. "गजानना श्री गणराया आधी वंदु तुज मोरया..", "गणराज रंगी नाचतो.." ही गाणी कोणत्या मराठी माणसानी ऐकली नसतील? "श्रीरामचंद्र कृपालु भजमन.." किंवा "पायो जी मैंने रामरतन धन पायो.." आदि प्रभु श्रीरामाची गीत कोणास राममय करुन सोडली नसतील? "ए मेरे वतन के लोगों" ने तर पंडित नेहरूजी सारख्या पुढाऱ्यांच्या डोळ्यात अश्रु आणुन सोडले. या गाण्यातून तू आमच्या वीर सैनिकाना श्रद्धांजलि देवून त्यांस अणि त्यांच्या बलिदानस अमर केलस   

कवी ग्रेसची कवीता "भय इथले संपत नाही..." तुझ्या आवाजात कशी कातरवेळी घेवून जाते! "सीली हवा छू गई, सीला बदन छिल गया.." हे तू गायिलेले गीत पण त्यातलेच एक. "राम तेरी गंगा मेली" किंवा "हीना" या चित्रपटांत तू गायीलेली सीने गीते, त्यामधे तू घेतलेला आलाप अगदी रानात कोकिळा जशी करते ना तसेच वाटतात. एकट्यात तुझी गाणी ऐकताना वेळ कसा अगदी भूरर्कन उडून जातो हे कळतच नाही. जेव्हा तंद्री टूटते, बराच उशीर झालेला असतो. तू विश्वाला भारावून, अगदी तल्लीन करुन सोडलंस आणि सदैव करत राहशील.

म्हणून तू आज  इथे नाहीस असे म्हणवतच नाही. तुझ्या गाण्यामधून तू सदैव आमच्यात आहेस. कोणी थकूनभागुन घरी येईल आणि तुझी गाणी ऐकेल, निश्चितच तो ताज़ा आणि टवटावीत होईल. आंतर आणि बाह्य  गोष्टीतुन येणाऱ्या नैराश्य आणि पराभावा सारख्या अत्यंत घातक भावनांमधून बाहेर पड़ण्यास तुझ्या गाण्यामधून तू अनेकांचे साह्य करतच राहशील. एकाग्र आणि तल्लीन होण्यास तुझी गाणी कारणीभुत होतच राहतील. तू इथेच आहेस आणि सदैव राहशील. तुला वंदन!

4 comments:

  1. मनातील संवेदना शब्दबध्द झाल्या.....

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेख आहे सर.

    ReplyDelete